गांधीजींच्या संकल्पनेतील आदर्श खेडे

या लेखात गांधीजींच्या संकल्पनेतील खेडे नक्की कसे होते ते बघू या.

“खेड्यांकडे चला” हे आपले तत्वज्ञान प्रत्यक्ष उदाहरणातून दाखवण्यासाठी ३० एप्रिल १९३६ ला गांधीजी सेगाव (आजचे सेवाग्राम) या ठिकाणी राहायला आले. त्यावर्षीचे कॉँग्रेसचे वार्षिक अधिवेशनही गांधीजींच्या आग्रहावरून फैजपुर या उत्तर महाराष्ट्रातील खेड्यात भरवण्यात आले.

फैजपुरहून परत आल्यावर गांधीजींना आलेल्या पत्रात एक पत्र होते बिरभूम, बंगाल इथल्या एका खेडूताचे. ‘तुमच्या मते एखादे आदर्श भारतीय खेडे कसे असेल?” असा प्रश्न त्यात विचारला होता.

या पत्राला दिलेल्या उत्तरात गांधीजी म्हणतात,

“आदर्श भारतीय खेड्यात सांडपाणी वाहून नेण्याची सुयोग्य रचना असेल. या गावातल्या प्रत्येक घरात पुरेसा सूर्यप्रकाश येण्याची व वायुवीजनाची सोय असेल. घर बांधण्यासाठी वापरलेला कच्चा माल ५ मैल त्रिज्येतूनच आला असेल. घरासमोरील अंगणात घरगुती वापरासाठी भाज्या लावण्यासाठी व गुरेढोरे बांधण्यासाठी जागा असेल. गावातील रस्ते आणि गल्ल्या यांवर अनावश्यक धूळ नसेल (ते स्वच्छ असतील). गावातील वेगवेगळया गरजांप्रमाणे गावात विहिरी असतील आणि त्यांचा सर्वजण वापर करू शकतील. तिथे सर्वांसाठी प्रार्थनास्थळे असतील, सामुदायिक सभांसाठी एक जागा असेल, गुरे चारण्यासाठी एक सामायिक गायरान असेल, एक सहकारी दुग्धव्यवसाय असेल. तिथे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असतील. त्या शाळांतून मुख्यत्वेकरून व्यावसायिक शिक्षण दिले जाईल. तंटेबखेडे व अन्य समस्या सोडविण्यासाठी ग्राम पंचायत असेल. हे खेडे स्वतःचे सर्व अन्नधान्य, भाज्या, व फळे स्वतःच पिकवेल. आपल्या वापरासाठी लागणारी खादी स्वतःच तयार करेल. ही आहे माझी आदर्श खेड्याची कल्पना..”

(संदर्भ: गांधी चरित्र १९१४–१९४८ – रामचंद्र गुहा)