गांधीजी व रिचर्ड केसी यांच्यातील चर्चा

१९४३ साली बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला. प्रथम तुरुंगवासात असल्याने व नंतर प्रकृती क्षीण असल्याने गांधीजी बंगालला भेट देऊ शकले नाहीत. शेवटी डिसेंबर १९४५ मध्ये ते बंगालमध्ये आले. बंगालचे गव्हर्नर होते ICS रिचर्ड केसी, मूळचे ऑस्ट्रेलियन. दुष्काळावर तोडगा म्हणून त्यानी धरणे बांधण्याच्या महत्वाकांक्षी योजना आखल्या होत्या. बंगालच्या त्रिभूज प्रदेशातून समुद्राला मिळणाऱ्या नद्या अडवून त्यांचे पाणी वापरण्याची ही योजना होती.

या योजनेबद्दल केसी यांचे भाषण वाचल्यावर गांधीजींनी त्यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी या योजनेवर टीका केली : “.. बंगालमधल्या तळागाळातील लोकाना जर प्रशासनात काही स्थान नसेल, तर तुमची ही भव्यदिव्य योजना अजिबात यशस्वी होणार नाही… वाया जाणारे पाणी अडवणे महत्वाचे असेल तर वाया जाणारे श्रम उपयोगी कार्यात आणणे हेही तितकेच महत्वाचे… बंगालमधील लाखो कष्टकऱ्यांना विणकाम व इतर कारागिरी यातून रोजगार मिळवण्यास उद्यूक्त केले पाहिजे…”

यावर रिचर्ड केसी यांनी गांधीजींना प्रदीर्घ उत्तर लिहिले. त्यांच्या आणि गांधीजींच्या दृष्टिकोनातील मूलभूत फरक हा होता:

  • केसी यांच्या मते व्यक्तीला संपन्नता आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी समाजाने / शासनाने नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण आणणे व त्यांची उत्पादकता वाढविणे जरुरीचे असते (‘control over the physical environment’ हे केसी यांचे शब्द). त्याशिवाय गरीबीचे उच्चाटन होऊ शकत नाही, आणि त्यामुळे निरक्षरता आणि रोगराई चालू राहते. या उदाहरणात, बंगालमधील जमीन आणि नद्यांचे पाणी ही ती नैसर्गिक संसाधने.
  • गांधीजींच्या मते, माणसाला श्रमाची किंमत व प्रतिष्ठा समजणे सर्वात जास्त महत्वाचे. (‘Regard human labour more even than money and you have an untapped and inexhaustible source of income which ever increases with use’ हे त्यांचे पत्रातले शब्द). श्रमाची किंमत समजलेला माणूस नैसर्गिक संसाधनेही काळजीपूर्वक वापरेल हे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे सुतकताई, विणकाम, इतर गृहोद्योग हे त्यांना सरकारने बनविलेल्या महत्वाकांक्षी योजनांपेक्षा जास्त महत्वाचे वाटत होते.
  • केसी यांच्या मते गरीबी निर्मूलनासाठी नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण आणण्याचा मुद्दा हा ब्रिटिश-भारतीय यांच्यातील राजकारण, धर्म, व प्रशासकीय महत्वाकांक्षा या सर्वांच्या पलीकडचा होता. गांधीजींच्या मते मात्र हे सर्व मुद्दे एकमेकात गुंतलेले होते.

संदर्भ:

गांधी चरित्र १९१४–१९४८ – रामचंद्र गुहा

Collected Works of Mahatma Gandhi, Vol. LXXXII