इकोयुनिव्हचा पर्यावरण शिक्षण विचार : मूल समजून घेताना: बालवाडीतले मूल  

 

बालवाडीतल्या छोट्यांचे आपण घरी, शाळेत, मैदानावर, बागेत, किंवा अन्यत्र नीट निरीक्षण केले तर खालील गोष्टी लक्षात येतात: 

  • या मुलांचा आपल्या आजूबाजूच्या मोठ्या माणसांवर, विशेषतः पालक आणि शिक्षकांवर संपूर्ण विश्वास असतो. मुलांना नैसर्गिक व मानवनिर्मित जगाची पहिली ओळख मोठ्यांकडूनच होते. 
  • खेळणे आणि गोष्टी ऐकणे-सांगणे हे बालवाडी शिक्षणाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. तुम्ही मुलांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ‘कृती’ द्याल, पण मूल त्या सर्वांकडे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ म्हणूनच बघेल. गोष्टी हे त्यांचे जग समजावून घेण्याचे सर्वात आवडते माध्यम – कालचे जग आणि आजचे जग, वास्तव आणि कल्पनेतलं जग. गोष्टी सांगण्या-ऐकण्याचे अनेक प्रकार आहेत. मुलेही सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीत  नकळत भाग घेत असतात.   
  • खेळ आणि गोष्टींमधून काय द्यायचे आहे, काय शिकवायचे आहे, हे मोठ्यांना ठरविता येते. ते त्यांनी  विचारपूर्वक ठरवावे. मुलांना खेळायला किंवा गोष्टी सांगायला एकटे सोडले तर मुले स्वतःच्या कल्पनाशक्तीने नवीन खेळ, नवीन गोष्टीही निर्माण करत असतात. हे सर्व बघण्यासारखे असते. 
  • खेळण्याची आणि गोष्टी सांगण्या-ऐकण्याची आवड यावर आपण खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येतं की मोठं झाल्यावर माणसाचा स्वभाव, त्याच्या क्षमता व कौशल्ये या सर्वांवर या लहानपणातील काळाचा सूक्ष्म पद्धतीने  परिणाम झाला असतो. 
  • इतरांशी केलेले संभाषण, संवाद, एकत्र मिळून केलेल्या गोष्टी या सर्वातून मूल सदैव शिकत असते. यात इतर मुले, शिक्षक, घरातील व आजूबाजूला राहणारी इतर मोठी माणसे, हे सर्व आले. हे शिकणे मुख्यत्वे मानवनिर्मित जगाबद्दल असते. 

हे सगळं जरी खरं असलं, तरी बालवाडीतले मूल हे जीवशास्त्रीयदृष्ट्या ‘माणूस’ नावाच्या प्राण्याचे एक बाळ असतेच. ते आपल्या सर्व गरजांसाठी, स्वास्थ्यासाठी आपल्या आई-बाबांवर किंवा इतर मोठ्यांवर पूर्णपणे अवलंबून असते. म्हणूनच कुटुंब हे त्याच्यासाठी सर्वात महत्वाचे वर्तुळ ठरते. 

या वयात मुलांची शब्दसंपदा वाढत असते, ती वेगवेगळ्या वस्तू ओळखायला शिकत असतात. वस्तू आणि त्यांच्या रचना — मग ते टेकडीवरील दगडगोटे असोत की बिल्डिंग ब्लॉक्स सारखे खेळ — खेळण्यात मुले तासंतास घालवतात. हे त्यांच्या मेंदू आणि स्नायू यांच्या वाढीशी संलग्न असते. त्यांना गोष्टीही नीट लक्षात रहात असतात. कधीकधी त्या गोष्टींमध्ये स्वतःची कल्पनाशक्ती मिळवून ते नवीन गोष्टी तयार करतात.  

चांगलं बालवाडी शिक्षण कसं असतं? ते अनुभवातून शिक्षण देतं. मुलांना जगाचं निरीक्षण करायला पुरेसा वेळ, जागा, आणि संधी देतं. अनेक वेगवेगळ्या कृती-खेळ-उपक्रम-गोष्टी यातून शिकवतं. मुलांना मुक्तपणे हिंडू देतं, खेळू देतं. मुलांना आजूबाजूच्या समाजाशी नाते जोडून  देतं.

 

बालवाडीतील मुलांच्या निसर्ग शिक्षणासाठी  

मुलांच्या या वयातील नैसर्गिक प्रवृत्त्ती व वरील शिक्षण प्रक्रिया लक्षात घेऊन निसर्ग शिक्षणाचा एकंदर शिक्षणात अंतर्भाव व्हावा. 

  • या वयातील मुले मोठ्यांचे सतत निरीक्षण आणि अनुकरण करतात. जर त्यांचे कुटुंब निसर्गात फिरत असेल, समरस होत असेल, निसर्गातील वस्तू, जीव, घटना यांचा अनुभव घेत असेल, तर मूलही तसेच करेल. यामुळे त्याचे निसर्ग शिक्षण लहान वयातच सुरु होईल. निसर्गाचे हे पहिलेवहिले अनुभव पुस्तकांतून नाही, तर प्रत्यक्ष निसर्गात फिरूनच  घ्यायचे आहेत. 
  • या वयातील मुलांना आपल्या आजूबाजूच्या मानवनिर्मित जगाची, त्यातील प्रणालींची तोंडओळख होत असते. उदा. माझे कुटुंब हे गावाचा भाग आहे, गाव हे तालुका आणि जिल्ह्याचा एक भाग आहे, पुढे राज्य असते, इ.  जर आपण या वयात त्यांना हेही समजावून दिले, की हे मानवनिर्मित जग, ही संस्कृती, शेवटी सर्वात मोठ्या अशा निसर्गाचाच एक भाग आहे, तर त्यांना एक महत्वाची संकल्पना छोट्या वयातच कळेल. 
  • माणूस अन्न, कपडे, पाणी, घर या सर्व प्रमुख गरजांसाठी निसर्गावर अवलंबून असतो हेपण त्यांना साध्या-सोप्या भाषेत समजावून दिले जावे. 
  • निसर्गावर अवलंबून असलेले समाज आपल्या परिसरात असतील (उदा. आदिवासी वाडी, मच्छिमारांचे गाव, शेतीवर अवलंबून असलेले खेडे), तर त्यांची प्राथमिक माहिती मुलांना द्यावी. 
  • निसर्गाचे सौंदर्य मुलांना दृष्टी, ध्वनी, स्पर्श, वास, चव, आदी इंद्रियांद्वारे अनुभवता यावे.